लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या अनुदानित शाळा, कर्मशाळा तसेच मतिमंद बालगृहांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यातील ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित कल्यांनतर नाशिकमधील शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिव्यांगांच्या शाळा/कर्माशालांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्या पार्श्वूमीवर सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय जारी करीत संबंधित शाळांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल जिल्हा दिव्यांग शाळा व कर्मशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी महेंद्र वाघमोडे, बाळासाहेब भुजबळ, रवींद्र कांबळे, प्रदीप निकम, मिलिंद मून, सीताराम नलगे, रमेश वनिस आदींनी निर्णयाचे स्वागत केले आहे.