नाशिक: मनपा कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन लागू करण्यात आलेला आहे. दि. १ जानेवारी २०१६ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीचे सातव्या वेतन आयोग फरकाचे चार हप्ते शासकीय कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेले आहेत. मात्र, नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांना आतापर्यंत फक्त दोनच हप्ते देण्यात आलेले आहेत. शासन निर्णयानुसार नामनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा, तिसरा व चौथा हप्ता एकत्रित द्यावा अशी मागणी होती.
सोमवारी यासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी - कामगार सेना अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत तिसरा हप्ता ३० जानेवारी २०१४ अखेर देण्यास मंजुरी दिली. तर दिवाळीनिमित्त १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे प्रशासनाने मान्य केले. बैठकीत मनपा आस्थापनेवरील कार्यरत पात्र कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ तातडीने लागू करणेबाबत संघटनेची मागणी आहे. हे लाभ लागू करणे कामी कार्यवाही सुरू केली असून, डिसेंबर २०२३ अखेर सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ लागू करण्याचे मान्य केले आहे.
मनपा आस्थापनेवरील पात्र कर्मचाऱ्यांना तातडीने पदोन्नती देणेबाबत मागणी होती. न्यायालयाच्या आदेशानुसार दोन संवर्ग वगळता उर्वरित सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे लाभ ऑक्टोबर २०२३ अखेर देण्यात येतील, असे बैठकीत मान्य करण्यात आले. बैठकीस म्युनिसिपल कर्मचारी - कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप, सुधाकर बडगुजर, सोमनाथ कासार, किशोर कोठावळे, नंदू गवळी, अर्जुन विधाते, विष्णू दातीर, तुषार ढकोलिया, रावसाहेब रूपवते, श्रीहरी पवार, एम.डी. पवार, प्रकाश उखाडे, कमलकिशोर वर्मा, चंद्रशेखर दातरगे, रवी गायकवाड, रवींद्र येडेकर, रामदास खातळे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, उप आयुक्त (प्रशासन), लक्ष्मीकांत साताळकर, डॉ. आवेश पलोड, रमेश बहिरम आदी उपस्थित होते.