नाशिक : गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नाल्यांमध्ये जाणारे पाणी अडवून ते वळविले जात आहे. त्यामुळे आनंदवली परिसरातील नाल्यांमधून नदीपात्राचे होणारे प्रदूषण थांबवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तपोवन मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर ओझोनायझेशनची प्रक्रिया केली जात आहे. या प्रयोगामुळे गोदावरी नदितील फेसाळलेले पाणी कमी होणयास मदत हेाईल, असे मत गोदावरी शुद्धीकरणासाठी गठीत उपसमितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
गोदावरी शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्य अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली असून, या समितीची उपसमिती असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य समिती सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली यावेळी याबाबत माहिती देण्यात आली. औद्योगिक प्रदूषणाविषयी बैठकीत नेहमीच चर्चा होते. मात्र औद्योगिक क्षेत्रात गटारी आणि मलनिस्सारण प्रकल्प केंद्रांची जबाबदारी उच्च न्यायालयाने प्रदूषण मंडळाकडे दिली असताना मंडळ आणि महापालिका यांच्यात जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला.
नाल्यांच्या माध्यमातून गोदावरी नदीत होणारे प्रदूषण यावर चर्चा करताना गंगापूररोड परिसरातून जाणारे नाल्यांचे पाणी मलवाहिकेतून गंगापूर मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यात आले आहे. १८ एमएलडी क्षमता असलेल्या केंद्रामुळे बारदान फाटा नाला आणि सोमेश्वर नाला कोरडा पडलेला आहे. कारण या नाल्यातील सांडपाणी गटार व्यवस्थेला जोडण्यात आले आहे. आनंदवल्ली बंधाऱ्यातही येऊन मिसळणारा नाला, चिखली नाला, आसाराम बापू पुलालगतच्या नाल्यातून होणारे प्रदूषण थांबल्याची यावेळी माहिती देण्यात आली.
चोपडा नाल्यातून गटारीचे पाणी पात्रात मिसळत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र या भागातील मलजल पाणी गटारीत वळविण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. लेंडी नाल्यातून पात्रात सांडपाणी मिसळू नये म्हणून महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम हाती घेतले आहे. हे काम ४० टक्के पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
इन्फो...
तपोवन येथे ओझोनायझेशन प्रक्रिया
नेरीच्या नव्या निकषानुसार सर्व मलनिससारण प्रक्रिया केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त मलजलाचा बीओडी दहापेक्षा कमी करावा लागणार आहे. हे खूप खर्चिक काम असल्याने सध्या तपोवन मलनिस्सारण केंद्रात ओझोनायझेशनची प्रक्रिया करण्याचा अनोखा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.