लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शंभर रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पाच संशयितांपैकी प्रमुख संशयित मोकाशी याच्या घरी छापा टाकून नोटाछपाईसाठी वापरण्यात येणारे प्रिंटिंगचे साहित्य जप्त केले आहे़ दरम्यान, या संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वाढ केली आहे़१ जुलै रोजी पाथर्डी फाट्यावर गुन्हे शाखेने सापळा लावून संशयित इंडिका (एम.एच. ०५, एबी ७४०९) कार ताब्यात घेतली. कारमधील संशयित प्रशांत विनायक खरात (४७, रा़ वीर संभाजीनगर, आसनगाव, ता़ शहापूर, जि़ ठाणे), कांतिलाल यशवंत मोकाशी (४८, खर्डी दळखंड, दत्तमंदिराजवळ, ता़ शहापूर, जि़ ठाणे), राजेंद्र बन्सीलाल परदेशी (५२, रा़ खर्डी, ता़ शहापूर, जि़ ठाणे), उत्तम अरुण गोळे (१९, रा. कवडास, ता़ शहापूर, जि़ ठाणे) यांना अटक केली. त्यांच्याकडील बॅगमधून शंभर रुपयांच्या १७०२ बनावट नोटा अर्थात १ लाख ७० हजार २०० रुपये जप्त केले़ तर गुन्हे शाखेतून फरार झालेल्या मोकाशी यास इगतपुरी, तर अण्णा कुमावत यास जेलरोड परिसरातून अटक करण्यात आली होती़ पोलिसांनी प्रमुख संशयित मोकाशी याच्या खर्डी दळखंड येथील घरी छापा टाकून प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, कात्री असा ४१ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़
शंभराच्या बनावट नोटा छपाईचे साहित्य जप्त
By admin | Published: July 08, 2017 12:22 AM