नाशिक : नाशिक दौऱ्यावर मुक्कामी आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निफाड तालुक्यातील शिवडी येथील द्राक्ष निर्यातदार मधुकर क्षीरसागर यांची द्राक्ष त्यांच्या कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी नागलवाडी येथे दिले. द्राक्ष देण्याबरोबरच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान शासनाने तत्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याशी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सविस्तर चर्चा केली. द्राक्ष, डाळींब व इतर पिके घेताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, पिके घेताना घ्यावयाची मेहनत व येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत गारपीट, अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान याबाबत माहिती दिली. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील द्राक्षासह डाळींब, कांदा उत्पादकांचे तसेच अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत नुकसानभरपाईबाबत घोषणा झालेली आहे, प्रत्यक्षात नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही विजयश्री चुंबळे यांनी राज्यपालांकडे केली. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर पोहोचण्याबाबत शासनस्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नाशिकच्या शिवडीची द्राक्ष यानिमित्ताने राजभवनात पोहोचल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
शिवडीची द्राक्षे पोहोचली राजभवनात
By admin | Published: February 01, 2015 12:19 AM