कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नाशिक शहर व परिसरात रविवारी शांततेत शब-ए-बरात साजरी करण्यात आली. विविध मुस्लीम सामाजिक, धार्मिक संघटनांनी ऑनलाईन पध्दतीने प्रवचनाचे (वाझ) कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यु-ट्युब चॅनलच्या माध्यमातून बहुतांश धर्मगुरुंनी ऑनलाईन प्रवचन देत ‘शब-ए-बरात’चे महत्व सांगितले. कोरानाचा प्रादुर्भाव रोखणसाठी शहरातील बहुतांश कब्रस्तानांचे प्रवेशद्वार संबंधित विश्वस्तांकडून बंद ठेवण्यात आले होते. रात्री कोठेही समाजबांधवांची गर्दी दिसून आली नाही. दरम्यान, मशिदींमध्ये केवळ मुख्य धर्मगुरुंसह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कोरोनाच्या समुळ उच्चाटनासाठी ‘दुवा’ करण्यात आली. समाजबांधवांनी आपआपल्या घरांमध्ये राहुन रात्री उशिरापर्यंत कुराणपठणासह विविध धार्मिक उपक्रम केले. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनीही समाजबांधवांना शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत शब-ए-बरात साजरी करण्याचे आवाहन पुर्वसंध्येलाच सर्व मशिदींमध्ये निवेदन पाठवून केले होते. या निवेदनाचे वाचन शुक्रवारच्या दुपारच्या नमाजदरम्यान तसेच शनिवारी धर्मगुरुंकडून करण्यात आले होते.
दरम्यान, जुने नाशिक परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी आगामी सण-उत्सवांचा काळ आणि कोरोनाच्या नियमांच्या पालनाविषयी नागरिकांत जागृती व्हावी, यासाठी सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दंगल नियंत्रण पथकाच्या तुकडीने संचलन केले.