नाशिक : देशामधील जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश या राज्यांत घडलेल्या संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणाऱ्या अमानवी अशा दुर्देवी बलात्काराच्या घटनेने सर्वच हादरले आहेत. देशभरातून सर्व जाती-धर्माचे लोक रस्त्यावर उतरून या घटनांचा निषेध करत असून संशयित आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. नाशिकमधील ५० मशिदींच्या प्रवेशद्वारावर आज रात्री ‘शब-ए-मेराज’च्या औचित्यावर या घटनांंचा निषेध म्हणून शरियत बचाव कमिटीच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असल्याचे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले.
इस्लाममध्ये ‘शब-ए-मेराज’ या रात्रीला विशेष महत्त्व असून या रात्रीनिमित्त मशिदींमध्ये नमाजपठण व धार्मिक कार्यक्रमांसाठी समाजबांधवांची मोठी गर्दी लोटते. या पार्श्वभूमीवर शरियत बचाव कमिटीच्या वतीने स्वाक्षरी अभियान घेतले जाणार आहे. जम्मूच्या कठुआ आणि उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये घडलेल्या पाशवी बलात्काराच्या घटनांचा निेषेधार्थ अधिकधिक लोकांनी स्वाक्ष-या करुन संबंधित संशयित आरोपींना फाशीच्या शिक्षेच्या मागणीला समर्थन दर्शवून सरकारपर्यंत भावना पोहचाव्या, हा उद्देश आहे. देशभर हॅशटॅगसह ‘रेपरोको’ अभियान हाती घेतले गेले आहे. अशा अमानवी घटनांच्या निषेध स्वाक्षरी अभियानाने नोंदविला जाणार असून मृत मुलींसाठी प्रार्थनाही केली जाणार आहे. तसेच बलात्कार करणा-या नराधमांना पाठीशी घालणा-यांचा निषेधही यावेळी केला जाणार आहे. खतीब यांनी यासंदर्भात शरियत बचाव कमिटीच्या पदाधिका-यांशी चर्चा करुन शहरातील सुमारे ५० मशिदींच्या धर्मगुरूंना (मौलाना) याबाबत कल्पना दिली असून स्वाक्षरी अभियानाची व्यवस्था करण्याचे सुचविले आहे.