लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर कायदा अंमलात आल्यानंतर विविध वस्तूंसह सेवांवरही परिणाम झाला आहे. शाडू मातीच्या किमतीमध्ये मात्र कुठेही वाढ झाली नसून, माती जीएसटीमुक्त राहिल्याने यंदा इको फ्रेण्डली गणेशोत्सवाला अधिकाधिक चालना मिळणार आहे.जीएसटी अस्तित्वात आल्यानंतर काही वस्तू व सेवांच्या किमतींमध्ये फरक पडला. कुठे महागाई अधिक वाढली तर कुठे कमी झाली. पीओपीच्या दरामध्ये वाढ झाली असून, १२ टक्के जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे पीओपीपासून तयार होणाऱ्या गणरायाच्या मूर्तींच्या किमती वधारण्याची शक्यता आहे; मात्र पर्यावरणपूरक ठरणाऱ्या शाडू मातीच्या किमती स्थिर राहू शकतात. कारण शाडू माती जीएसटी करमुक्त असून, यापूर्वी लागणारा विविध प्रकारचा करदेखील जीएसटी अंमलात आल्यामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे शाडू माती पूर्णपणे करमुक्त असून, पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्तींना यंदा नाशिककरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुढील महिन्याच्या २५ तारखेला गणेश चतुर्थी असून, बाप्पांचे आगमन थाटामाटात होणार आहे. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. गणेश मंडळांकडून नियोजनाची आखणी केली जाऊ लागली आहे. काही मंडळांनी शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले असून, मूर्तिकारांकडे आगाऊ नोंदणीही केली आहे. दरवर्षी नाशिककर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देतात. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर बाप्पांना भावपूर्ण निरोप देताना नाशिककर जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती संकलन केंद्रांवर मोठ्या संख्येने मूर्तींचे दान करतात. मूर्तीदानाचा आकडा दरवर्षी लाखोंच्या घरात असतो. यावर्षी शाडू मातीच्या मूर्तींच्या किमती स्थिर राहणार असल्याने नागरिकांपुढे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक चांगला सुलभ पर्याय खुला झाला आहे. दरवर्षी पीओपीच्या गणेशमूर्तीच्या किमतीच्या तुलनेत शाडू मातीच्या गणरायांचे दर कमी असतात; मात्र यावर्षी पीओपीच्या गणरायांच्या मूर्ती अधिक महागण्याची चिन्हे आहेत. कारण जीएसटीमुळे १२ टक्क्यांचा कर पीओपीच्या खरेदीवर भरावा लागणार आहे.
शाडूचे बाप्पा ‘जीएसटी’मुक्त
By admin | Published: July 10, 2017 12:23 AM