‘शक्ती’ पणास !
By किरण अग्रवाल | Published: August 5, 2018 01:48 AM2018-08-05T01:48:13+5:302018-08-05T01:49:15+5:30
जुनं ते सोनं असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात जुन्या लोकांकडे घरात व बाहेरही दुर्लक्षच होत असल्याचे अधिकतर दिसून येते. राजकारणात तर जुनी माणसं अडगळीत टाकली गेल्याचेच पहावयास मिळते. आपल्या मताला किंमत नाही किंवा आपल्याला साधा सन्मानही मिळत नाही, या भावनेतून तसेच नवीन लोकांशी सांधा जुळत नाही म्हणून ही मंडळी बाद झाल्यागत स्वत:ला अलिप्त करून घेतात. जुन्या जाणत्यांची, ज्येष्ठांची ही अलिप्तता कोणत्याही पक्ष-संघटनेसाठी मारकच ठरणारी असते.
जुनं ते सोनं असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात जुन्या लोकांकडे घरात व बाहेरही दुर्लक्षच होत असल्याचे अधिकतर दिसून येते. राजकारणात तर जुनी माणसं अडगळीत टाकली गेल्याचेच पहावयास मिळते. आपल्या मताला किंमत नाही किंवा आपल्याला साधा सन्मानही मिळत नाही, या भावनेतून तसेच नवीन लोकांशी सांधा जुळत नाही म्हणून ही मंडळी बाद झाल्यागत स्वत:ला अलिप्त करून घेतात. जुन्या जाणत्यांची, ज्येष्ठांची ही अलिप्तता कोणत्याही पक्ष-संघटनेसाठी मारकच ठरणारी असते. हेच लक्षात घेत आता बहुतेक पक्षांनी जुन्यांना जोडण्याच्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. नव्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याची त्यांची उपयोगीता त्या त्या पक्षासाठी लाभदायीच ठरावी. काँग्रेसनेही आपल्या ‘शक्ती प्रोजेक्ट’ अंतर्गत जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांकडे याचदृष्टीने बघता यावे.
काँग्रेसला घराघरात पोहचण्यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कल्पनेतून थेट त्यांच्याशी संपर्क करता यावा व त्यांची भूमिका विविध माध्यमातून समजून घेता यावी म्हणून ‘प्रोजेक्ट शक्ती’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील नोंदणीचा शुभारंभ नाशकातील पंचवटीत करताना पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्या-कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षप्रवाहात आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची भूमिका मांडली गेल्याने, या पक्षात अडगळीत पडलेल्यांमध्ये ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षा उंचावून गेली आहे. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष असल्याने, काळ जसा जसा बदलत गेला तसतसे नवे नेतृत्व पुढे येऊन जुने बाजूला सारले गेल्याचे दिसून येते. नवे लोक नवी संकल्पना व ऊर्जा घेऊन येतात, त्याचा पक्षाला लाभ होतोच; परंतु ते होताना जुन्यांचे विस्मरण घडून आले तर मार्गदर्शनाची प्रक्रिया अडखळते. काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर तेच होताना दिसते. एकेकाळी पक्षातर्फे आमदारकी-खासदारकी भूषविलेले अनेक मान्यवर केवळ सभा-समारंभात व्यासपीठाची शोभा वाढविण्यापुरते औपचारिक अस्तित्व दर्शवताना दिसून येतात. नेतृत्व करणारे बदलले की, हल्ली त्यांचे कार्यकर्तेही बदलतात, त्यामुळे जुने कार्यकर्तेही अशात बाजूलाच पडतात. नवीन लोकांकडून गरजेव्यतिरिक्त त्यांना सोबत अगर विश्वासात घेण्याची प्रक्रियाच घडून येत नाही. त्यामुळे पक्षाचे असूनही ते पक्षापासून दुरावल्यासारखे राहतात. या दुरावलेल्यांना व अडगळीत पडल्याची भावना झालेल्यांना पुन्हा पक्षप्रवाहात आणण्यासाठी ‘प्रोजेक्ट शक्ती’च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याने त्याचा लाभ काँग्रेसला होण्याची अपेक्षा करता यावी. माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीतही मध्य नाशकात झालेल्या एका कार्यक्रमात जनसंपर्काची शक्ती पक्षाला लाभदायी ठरण्याची अपेक्षा त्यांनी बोलुन दाखविली. अर्थात, प्रोजेक्टमध्ये नोंदणी केली म्हणजे झाले; असे न करता जुन्यांसह नव्यांना काही कृती कार्यक्रम दिला गेला तरच त्यांच्या ‘शक्ती’चा पक्षासाठी उपयोग घडून येऊ शकेल. पक्षाचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष आता या ‘शक्ती प्रोजेक्ट’च्या माध्यमातून काँग्रेसचे शक्ती वाढीस लावण्यासाठी कितपत परिश्रम घेतात, हेच आता पाहायचे. त्याअर्थाने त्यांचीच शक्ती पणास लागल्याचे म्हणता यावे.