पंचवटी : साधारणपणे महिन्याभरापूर्वी किरकोळ बाजारात किलोमागे शंभरी गाठणाऱ्या कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव जवळपास निम्म्याहून अधिक दराने घसरले आहेत. अशा परिस्थितीत मात्र रोजच्या जेवणात भाजीची चव वाढविणाºया लसणाची आवक अजूनही कमी असल्याने रस्त्यावर व आठवडे बाजारात लसणाने आपल्या दरात तेजी कायम ठेवली आहे.सर्वसामान्य ग्राहकांना एक किलो कांदा खरेदी करण्यासाठी ३० ते ४० रुपये लागतात, तर दुसरीकडे पावशेर लसूण खरेदीला ५० रुपये मोजावे लागत असल्याने दरवाढीने जेवणात लसणाची चव नकोशी झाली आहे. वर्षभरापूर्वी लसूण मालाला ५ ते १५ रुपये इतका कमी भाव मिळाला होता. त्यातच कमी पाऊस झाल्याने लसूण उत्पादकांनी लागवड कमी केली होती. भारतात मध्य प्रदेश, मनसोर, इंदूर, निमच येथील लसूण दाखल होत असतो. यंदा भरपूर पाऊस झाल्याने लसूण उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. आगामी पंधरवड्यात अजून मोठ्या प्रमाणात लसणाची आवक वाढून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होईल त्यामुळे बाजारभाव घसरण होईल, असा अंदाज बांधला जात आहे. सध्या बाजारात नवा कांदा विक्रीसाठी दाखल झाला असल्याने ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तर लसणाची बाजारात टंचाई असल्याचे निमित्त करून बाजारभावात तेजी कायम ठेवण्यात आली असून, ग्राहकांना काही महिन्यांपासून २०० ते २५० रुपये किलो बाजारभावाने लसूण खरेदी करावा लागत आहे.
शंभरी गाठलेल्या कांद्याचे दर घसरले; लसूण मात्र तेजीतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:25 PM