Nashik Lok Sabha ( Marathi News ): जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शांतीगिरी महाराजांनी आपल्या अर्जात शिवसेना पक्ष असा उल्लेख केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे महायुतीकडून महाराजांनाच उमेदवारी मिळणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "नाशिकच्या उमेदवारीबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मी तर नाशिकमध्येच आहे. त्यामुळे मुंबईत काय ठरलं, याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. त्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. मात्र ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात, ते सर्वांनाच भेटत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे बसून नाशिकमधील महायुतीचा उमेदवार ठरवतील. ते ज्या उमेदवाराचं नाव ठरवतील, त्या उमेदवाराचं काम आम्हा सर्वांना करायचं आहे. तोपर्यंत सर्वजण उमेदवारीसाठी प्रयत्न करतच राहणार," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका जाहीर केली.
महाराजांचं शक्तिप्रदर्शन
शांतीगिरी महाराज यांनी आज शेकडो भक्तगणांसह शक्तिप्रदर्शन केले. पंचवटीतून निघालेल्या या शोभायात्रेत ते बैलगाडीत बसून सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महायुतीत उमेदवारीचा घेाळ असताना शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना असा पक्ष लिहून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ३ मे पर्यंत त्यांना एबी फॉर्म सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या शुक्रवारी शांतीगिरी महाराज यांनी अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि काल रात्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. आज भक्तगणांसह शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार बैलगाडीत बसून ते शोभायात्रेत सहभागी झाले आणि नंतर उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीतही संघर्ष
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वर्षभर अगोदर उमेदवारी देण्याचे अश्वासन देऊन ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने नाराज असलेले विजय करंजकर हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज नेला असून तो भरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बोलवूनही तीन वेळा करंजकर हे त्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत आणि महायुतीच्या संपर्कात गेल्यानंतर तेथून दावेदारीसाठी त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आता तेच महायुतीला देखील अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.