नाशिक : जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सात मतदार संघांत सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिकलोकसभा निवडणुकीत उभे राहतील, अशी माहिती परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीत उमेदवारी करणार की नाही? याबाबत शांतीगिरीजी महाराज यांनी स्वत:मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे. हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. राजकारण असो किंवा समाजकारण यात निस्वार्थ-त्याग-वैराग्यता यांचा थेट हस्तक्षेप हे याचं मुख्य कारण आहे. कारण ‘जिथं राजकीय नेते तिथे स्वार्थ आणि जिथं संत तिथे विश्वास’ सध्या हेच समीकरण सर्व सामान्य माणसाच्या मनात रुजले आहे.आणि हे तितकेच खरे असून त्यासाठीच आम्ही राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. आमची लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही अन् पक्षासोबतही नाही. जनसामान्य नागरिकांसाठी आमची लढाई असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस स्वामी परमेश्वरानंदगिरीजी महाराज, रामानंदजी महाराज, निवृत्तीभाऊ कंडेकर, बाळासाहेब गामने,अरुण पवार, राजाराम पानगव्हाणे,रामराव डेरे, राजेंद्र पवार आदी उपास्थित होते.या सात मतदारसंघात घालणार लक्ष -जय बाबाजी भक्त परिवार छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगांव, जालना, दिंडोरी, अहमदनगर या सात लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत निस्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागी होणार आहे. निवडणुकीसाठी भक्त परिवार नियोजनबद्धरित्या प्रचार कार्याच्या कामाला देखील लागला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
शांतिगिरीजी महाराज लोकसभा निवडणूक लढणार, जिल्हाही ठरला; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय
By दिनेश पाठक | Published: January 29, 2024 3:18 PM