लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : समाजासाठी विघातक ठरू शकतील म्हणून दगडी भिंती आणि लोखंडी कवाडाच्या आत बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या हातांना मिळते केवळ कारागृहातील काम. काही जण त्यालाच शिक्षा मानून दिले ते काम करीत राहतात, तर काहींमधील कलावंत त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशाच एका अस्वस्थ कलाकाराच्या हातून सध्या करागृहात श्रीगणेशाची मूर्ती आकार घेत आहेत. सागर भरत पवार हा पेण येथील मूर्ती कारागीर नाशिकरोडच्या करागृहात सध्या शिक्षा भोगत आहे. कारागृहात येण्यापूर्वी आपल्या कलाविश्वात रमणारा सागर पेण येथील आपल्या कारखान्यात गणपती मूर्ती बनवत असे. गणपती मूर्ती बनविणे हा त्याच्या कुटुंबीयांचा मूळ व्यवसाय. घरातूनच त्याला या कलेचा वारसा मिळाला आहे. परंतु एका गुन्ह्यात तो नाशिकरोडच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. सागर हा पदवीधर असून, मुंबईतील जेजे स्कूल आॅफ आर्टमधून त्याने फाइन आर्टस्चे शिक्षण पूर्ण केले आहे. हाडाचा कारागीर असल्याने त्याच्यातील कलावंत त्याला स्वस्थ बसू देईना. गणेशोत्सव जवळ आल्याने तर त्याची अस्वस्थता अधिकच वाढली होती. त्याने सदर बाब कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी यांना सांगितली आणि त्यांनीही त्याच्यातील कलाकाराला हेरले.
‘त्या’ हातांनी मूर्तीला आकार
By admin | Published: June 19, 2017 1:26 AM