नाशिक - सत्तास्थानांच्या वाटपावरून राज्यात भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या खेचाखेचीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेनेकडून पोरखेळ सुरू आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. तसेच राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी आज नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर टीका केली. राज्यात सत्तास्थापनेच्या नावाखाली भाजपा आणि शिवसेनेकडून पोरखेळ सुरू आहे, असा टोला पवार यांनी लगावला. दरम्यान, महायुतीतील मतभेदांमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील सध्याची परिस्थिती तसेच विधानसभा निकालांसंदर्भात माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीबाबत सरकारकडे निवेदन देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे शेतकाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी आपण सरकारकडे करु, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकमधील शेतकऱ्यांना दिली.
भाजपा-शिवसेनेकडून राज्यात पोरखेळ चाललाय, शरद पवार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 11:01 PM