राष्ट्रवादीतील फेरबदल : जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षपददेखील बदलणार
नाशिक : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादीने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यानुसार जबाबदारीचे वाटप करताना नाशिकची जबाबदारी ही याच जिल्ह्यातील स्थानिक नेते असलेल्या आणि माजी उपमुख्यमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना डावलून थेट धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे संघटनात्मक बदल करताना जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षदेखील बदलण्यात येणार असून, त्यामुळे अनेकांनी दावेदारीची तयारीदेखील केली आहे. आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सध्या सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत.
राज्यात महाविकास आघाडी असली तरी घटक पक्षांनी आपआपल्या बळावर तयारी सुरू केली आहे. अशावेळी राष्ट्रवादीत तर सध्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. पक्षाच्या अलीकडेच पार पडलेल्या बैठकीत अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांची जबाबदारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर हे मराठवाड्याला जोडून त्याची जबाबदारी धनंजय मुंडे, विक्रम काळे आणि सतीश चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक म्हटले की छगन भुजबळ हे सर्वेसर्वा मानले जातात. ते ज्येष्ठ नेते असल्याने संघटनेवर त्यांची पकड आहे. मात्र, अशावेळी त्यांना टाळून धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन जबाबदारी दिलेले नेते बुथ प्रमुखांच्या पडताळणीपासून अन्य कामे करणार आहेत, त्यामुळे भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला या कामांची जबाबदारी दिलेली नाही, असे यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले.
उत्तर महाराष्ट्रातून नाशिकच तोडले
नाशिक ही उत्तर महाराष्ट्राची राजधानी मानली जाते. पाच जिल्ह्यांचे केंद्र विभागीय आयुक्तालय नाशिकला आहे. मध्यंतरी जळगाव येथे धुळे, जळगाव आणि नंदुरबार हा वेगळा विभाग करण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथील एका कार्यक्रमात जाहीर केले होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, त्यावर राष्ट्रवादीने कडी करीत नाशिक आणि नगरला थेट मराठवाड्याला जोडले आहे.
जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलणार
राष्ट्रवादीत संघटनात्मक बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या असून, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षदेखील बदलले जाणार आहेत. सध्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार हे सुमारे आठ वर्षांपासून या पदावर आहेत. तर दुसरे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आणि रंजन ठाकरे यांना सुमारे पाच ते सहा वर्षे इतका कालावधी झाला आहे.