श्याम बागुल, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वत्र संभ्रमाचे वातावरण असतांना नाशिक शहरातील राष्ट्रवादीचे व विशेषत: शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत गटाची सोमवारी (दि.५) सकाळी बैठक होवून त्यात अजित पवार वा छगन भुजबळ यांच्या पाठीमागे न धावता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच साथ देण्याचा निर्णय अनौपचारीक घेण्यात आला. पक्षातील किती पदाधिकारी, कार्यकर्ते पवार यांच्या पाठीशी आहेत, ते पाहण्यासाठी मंगळवारी (दि.६) अधिकृत बैठकही बोलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील सहाही आमदारांनी अजित पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. त्यातील भुजबळ यांनी तर मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कोणाच्या पाठीशी उभे राहतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात अजित पवार व छगन भुजबळ यांना मानणारा वर्ग असून, त्यातच जुने व निष्ठावंत कार्यकर्ते शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून आहेत.
अशा परिस्थितीत रविवारी दुपारनंतर निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणात राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नरो वा कुंजरोवा अशी भूमिका असतांना सोमवारी (दि.५) सकाळी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी काही निवडक पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून बोलावून घेत पक्षातील घडामोडींवर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने छगन भुजबळ यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर अजित पवार यांनी पक्षाची सुत्रे घेतली. शरद पवार यांनी मात्र बंडखोरांची साथ सोडल्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी यावर पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले.