नाशिक: बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे खूप आभार मानले. मात्र, यानंतर एका मुलाखतीत बोलताना आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान केले. यावरून देशभरातून कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. मात्र, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना कंगना रणौतला पाठिंबा देत ती योग्य असल्याचे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी केवळ एकाच वाक्यात या प्रकरणाचा निकाल लावल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार निफाडला आले असताना पत्रकारांनी त्यांना विक्रम गोखले यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी, असे मला वाटत नाही. असे लोक असतात समाजात, असे सांगत शरद पवार यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
त्यांना दिवस मोजायचे काम करावे लागेल
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कधीही कोसळणार असल्याचे भाकित केले होते. त्यावर बोलताना, भाजपचे नेते अधूनमधून सरकार पडणार असल्याचे बोलत असतात. आम्ही जर ठरवून घेतले आहे की जुळवून घ्यायचे, त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल, असे म्हणणाऱ्यांना दिवस मोजायच काम करावे लागेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
दरम्यान, तुम्ही जिथे आहात तिथे प्रश्न सोडवले पाहिजे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा, असे म्हणणे अयोग्य आहे. न्यायालयाने देखील याबाबत स्पष्ट भूमिका दिलेली आहे. त्यामुळे यातून केवळ कामगारांचे नुकसान होत आहे. एकादशीला असंख्य लोकं वारीला जातात. त्यांचेही हाल झाले असून, आस्तेला धक्का बसविण्याच काम केले जात आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर दिली.