नाशिक- गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावासामुळे जिल्ह्यात सुमारे ५० टक्के खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही थांबेनासे झाले आहेत. या पावसाचा साडेलाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नाशिक मध्ये असून दुपारी ते विविध भागात पाहणी करणार आहेत.
नुकसानीमुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कालच सटाणा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आज सायंकाळपर्यंत नुकसानीबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असून एकुर दीडशे टक्के अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर अखेरनंतर ऑक्टोबर संपतानाचा सुद्धा पाऊस सुरूच असून त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोयाबीन, मका, द्राक्ष आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र ७ लाख ४० हजार हेक्टर इतके असून त्यापैकी ३लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. म्हणजेच सरासरी ५० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. विशेषत: मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या पीकाचे क्षेत्र २.२५ लाख हेक्टर असून त्याच्या ६० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. दर द्राक्षाचे एकूण क्षेत्र ६० हजार हेक्टर इतके असून ७० टक्के पिकाचे नुकसान झालेआहे. बाजारीचे क्षेत्र १ लाख १० लाख हजार हेक्टर असून ६० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे क्षेत्र ७३ हजार हेक्टर असूनत्यात८० टक्के नुकसान झाल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. लेटखरीप कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मालेगाव, सिन्नर, निफाड, त्र्यंबक, सटाणा आणि देवळा तालुक्यात झाले आहेत.