पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार vs अजित पवार समर्थक आमनेसामने
By श्याम बागुल | Published: July 4, 2023 04:36 PM2023-07-04T16:36:14+5:302023-07-04T16:36:53+5:30
शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक आमने-सामने
श्याम बागुल, नाशिक : राष्ट्रवादीच्या बंडानंतर नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार गट विरूद्ध अजित पवार, छगन भुजबळ गट एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याने मोठा राजकीय तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या झिंदाबाद, मुर्दाबादच्या घोेषणा देत कार्यालयावर चालून जाण्यासाठी रेटारेटी होऊन पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
अजित पवार, छगन भुजबळ हे सत्तेत गेल्यामुळे नाशिकचे कार्यकर्ते कोणासोबत असा प्रश्न उपस्थित केला जात असतांनाच सोमवारी (दि.३) शरद पवार समर्थक निष्ठावंतांची गोपनिय बैठक होवून शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मंगळवारी (दि.४) पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठकही बोलविली होती. परंतु तत्पुर्वीच सकाळपासून राष्ट्रवादी व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनचा ताबा घेत तळमजल्यावर बसून होते. दुसरीकडे शरद पवार निष्ठावंत गटाच्या पदाधिकारी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयासमोर जमले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास शरद पवार यांच्या समर्थकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही बाजुंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी बाका प्रसंग ओळखून दोन्ही गटांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्या गटाला कार्यालयात प्रवेश देण्यात पोलिसांनी हरकत घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले.