संजय पाठक, नाशिक- सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय गाजत असून त्यातच काल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही कोणतीही राजकीय भेट नव्हती तर आरक्षणाच्या विषयावरून पेटवापेटवीचे सुरू असलेले राजकारण थांबवावे यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी करावी यासाठीच त्यांना भेटल्याचे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.
आज सकाळी नाशिकच्या भुजबळ फार्म येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सुरू झालेल्या राजकिय चर्चांबाबत भूमिका मांडली. शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आहेत राजकारणाबरोबरच त्यांचा समाजकारणाचा अनुभव देखील दांडगा आहे त्यामुळे त्यांनी या विषयांमध्ये लक्ष घालावे यासाठी आपण त्यांची भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षणातील कळत नाही असा कोणताही मुद्दा आपण मांडला नाही तर राजकारण सगळेच करतात परंतु समाजकारणामध्ये शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी विनंती शरद पवार यांना केली असे ते म्हणाले आरक्षणासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीत कोणा कोणाला बोलवावे या नावांची देखील चर्चा करण्यात आली. यात उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह काही नावे सुचवण्यात आली. मात्र, शरद पवार यांनी कमी व्यक्ती असेल तर प्रश्न लवकर सुटेल अशी सूचना केली त्यामुळे बैठकीला कोणाला बोलवावे याबाबत शरद पवार हेच निर्णय घेतील असेही भुजबळ म्हणाले.