नाशिक : जिल्हा बॅँकेत अध्यक्ष पदासाठी दिवसेंदिवस गणिते बदलत असून, आता ही निवडणूक पक्षीय पातळीवर येण्याची चर्चा सुरू झाली आहे. हिरे पॅनलला आणि पर्यायाने भाजपाला रोखण्यासाठी आता थेट शरद पवार यांची मदत घेण्याची तयारी कोकोटे-पिंगळे गटाकडून केली जाण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बॅँकेत प्रथमच भाजपाचे सहा संचालक निवडून गेले असून, त्यात कोेकाटे-पिंगळे गटाकडून स्वत: माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह खासदार हरिश्चंद्र चव्हाण व आमदार सीमा हिरे यांचा समावेश आहे, तर हिरे गटाकडून आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे या हिरे बंधूंचा समावेश आहे. तसेच जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर देवळ्यातून बिनविरोध निवडून आले असून, सद्यस्थितीत ते हिरे गटासोबत सहलीला रवाना झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा बॅँकेवर राष्ट्रवादी व कॉँग्रेसचीच सत्ता असून, आताही सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या संचालकांकडून थेट पक्षाध्यक्ष व माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांची ऐनवेळी मदत घेण्याची तयारी कोकाटे-पिंगळे गटाने सुरू केल्याचे समजते. हिरे गटाकडून दोन्ही हिरे बंधूना त्यांच्या सोबत सहलीला गेलेल्या काही संचालकांचा विरोध असून, हिरे बंधू वगळता भाजपाचे एकमेव संचालक केदा अहेर यांना जिल्हा परिषदेच्या अधिनियमामुळे अध्यक्ष पद स्वीकारता येणार नाही. मात्र त्यांनी जिल्हा परिषदेच्या पदांचा त्याग केल्यास त्यांना अध्यक्ष पद भूषविण्याची संधी आहे. मात्र असे होणे क्वचितच शक्य आहे. शिवाय कोकाटे-पिंगळे गटाकडे येणाऱ्या संचालकांचा माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्ष पदाला विरोध आहे. त्यामुळे कोकाटे गटाकडून सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने कोकाटेंना थांबवून राष्ट्रवादीचे संचालक अध्यक्षपदासाठी पुढे करून शरद पवारांची मदत घेण्याची तयारी करण्यात येत आहे. पवारांनी मध्यस्थी केल्यास त्यांचा शब्द अव्हेरण्याची ताकद हिरे गटासोबत सहलीला गेलेल्या दोेन-तीन संचालकांमध्ये नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी चुरस वाढत असल्याचे चित्र आहे. अजूनही दोन्ही पॅनलसोबत आमदार जे. पी. गावित, नामदेव हलकंदर, शिवाजी चुंबळे, सचिन सावंत, सुहास कांदे आदि संचालक जाऊन मिळालेले नाहीत. त्यामुळे अध्यक्ष कोेणत्या गटाचा होतो, याबाबत प्रचंड चुरस वाढली आहे. (प्रतिनिधी)
भाजपाला रोखण्यासाठी शरद पवारांची मदत घेणार?
By admin | Published: May 29, 2015 11:51 PM