निफाड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निफाड येथे होणाऱ्या जाहीर सभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.
मैदानावर लाल बावटाचेच अधिक अस्तित्व दिसून येत असल्याने सभा राष्ट्रवादीची की माकपाची असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे त्याशिवाय निफाड शहरात शरद पवारांची साथ सोडणारे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनीही शरद पवार यांचे स्वागत करणारे फलक झळकविल्याने चर्चेला उधान आले आहे.
शरद पवार यांची आज निफाड येथे सभा होत आहे. या सभेला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले आहेत. निफाडच्या रस्त्यावरवर लाल बावटा हाती घेतलेले कार्यकर्ते दिसून येत आहे. आदिवासी पेठ, दिंडोरी, सुरगाणा या भागातून मोठ्या संख्येने लोक वाहनांमधून येत आहेत. स्थानिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे झेंडे तुलनेत कमी दिसून येत आहेत. पवार यांच्या सभेला माकप, उबाठा गटाने बळ पुरवल्याचे दिसते.