लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : राज्यस्तरीय वकील परिषदेच्या समारोपानिमित्त उपस्थित राहण्यासाठी नाशिकला आलेले राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी वकील परिषदेला उपस्थित न राहता अचानक मुंबईची वाट धरल्याने रविवारी राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा झडली. पवार का मुंबईला रवाना झाले याबाबत अधिकृत माहिती कोणी देवू शकले नसले तरी, पवार का नाराज झाले याची चर्चा मात्र राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील होत होती.
महाराष्टÑ व गोवा बार कॉन्सिलच्यावतीने नाशिाक येथे दोन दिवशी राज्यस्तरीय वकील परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले तर समारोपाला शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी रविवारी सकाळी पवार हे हेलिकॉप्टरने नाशिकला दाखल झाले. आडगाव येथील एमईटी महाविद्यालयाच्या मैदानावर पवार यांचे आगमन झाल्यावर पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, रविंद्र पगार, रंजन ठाकरे आदींनी त्यांचे स्वागत केले. पवार यांनी काही वेळ महाविद्यालयात घालविला. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यात आल्यानंतर पवार मुंबईकडे सकाळीच रवाना झाले. त्यामुळे वकील परिषदेसाठी नाशकात येवूनही पवार मुंबईकडे रवान का झाले याचे कोड हेलिपॅडवर उपस्थित असलेल्या राष्टÑवादीच्या नेत्यांनाही सुटले नाही. विशेष म्हणजे ज्यावेळी पवार यांचे नाशकात आगमन झाले, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा समारंभ सुरू होता. त्यामुळे वकील परिषदेच्या मुख्य कार्यक्रमाला न बोलविता समारोपाला बोलविल्यामुळे पवार नाराज तर झाले नसावेत असाही काहींनी अंदाज व्यक्त केला. तर नाशकात येवूनही पवार वकील परिषदेला का आले नसावे याबाबत परिषदेतील वकीलांमध्येही चर्चा रंगली होती. असे असले तरी, जरी शरद पवार वकील परिषदेला उपस्थित राहू शकले नसले तरी, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणाने परिषदेचा समारोप करण्यात आला.