नाशिक : ग्वाल्हेर परंपरेतील ज्येष्ठ गायक पंडित शरद साठे त्यांच्या सुमधुर शास्त्रीय गायनाने नाशिककरांची सायंकाळ स्वरमय झाली. शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभाग व एन. सी.पी.ए. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कुर्तकोटी सभागृहात शरद साठे यांच्या शास्त्रीय संगीताची मैफली रंगली.यावेळी त्यांनी राग पुरिया कल्याणमधील ‘कैसी अंधेरिया रैन’ बंदिशीसह‘नटखट नैना मतवारे रे’ बंदिश सादर करीत श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर यमन रागातील एक ख्याल त्यांनी आळवत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा गायनाविष्कार त्यांनी नाशिककर रसिकांसमोर सादर केला.ग्वाल्हेर घराण्याचे सगळ्यात ज्येष्ठ गायक म्हणून पंडित शरद साठे ओळखले जातात. मैफलीत पंडित शरद साठे यांना तरुण तबलावादक श्रृतिंद्र्र कातगडे यांनी तबला संगत, तर तरुण पिढीतील लोकप्रिय संगीत-अभ्यासक व संवादिनीवादक चैतन्य कुंटे यांनी संवादिनीवर तर साथ केली. शंकराचार्य न्यास (सांस्कृतिक विभाग) गेली जवळ-जवळ पाच वर्षे सातत्याने नाशिककर रसिकांकरिता दर्जेदार सांगीतिक कार्यक्रम आयोजित करीत आहे. या प्रयत्नात मुंबईस्थित आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (एन.सी.पी.ए.)ची साथ न्यासाला मिळाली आहे.
शरद साठे यांची मैफल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:21 AM