इंदिरानगर : शरयूनगरवासीयांचा वनवास केव्हा संपणार आहे. महापालिकेच्या हद्दीत असून, गावठाण भागाची परिस्थिती केव्हा बदलणार आहे, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी केला आहे.महापालिकेच्या दोन प्रभागातील हद्दीच्या वादामुळे दोघांनी केलेल्या दुर्लक्षामुळे शरयूनगर या शासकीय नोकरांच्या वसाहतीतील ३०० कुटुंबे मूलभूत समस्यांच्या विळख्यात अद्यापही अडकून पडली आहेत. सुमारे १२ वर्षांपूर्वीची शरयूनगरी वसाहत असून, त्यामध्ये ये-जा करण्यासाठी रस्ते नाहीत. वसाहतीमध्ये चढ-उतार आणि दगडधोंड्यांमधून पादचारी आणि वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागते. वसाहतीमध्ये कोणी आजारी पडले किंवा अत्यावश्यक काम असल्यास रिक्षाचालकसुद्धा येण्यास धजत नाही. तसेच पावसाळ्यात परिसरातील वाहनधारक आपली वाहने बाहेर काढत नाहीत. कारण पादचाऱ्यांनासुद्धा चालताना तारेवरची कसरत करावी लागते. दुसरीकडे आजूबाजूला मेट्रो झोनसारख्या उंच इमारती उभ्या करून नाशिककरांना साद घालत असताना त्याला लागूनच असलेल्या शरयूनगरातील रहिवासी मात्र एखाद्या निर्जनस्थळी राहात असल्याचे दिसून आले. तसेच भूमिगत गटारीची कोणतीही सोय नसल्याने परिसरातील बहुतेक रहिवाशांनी घरात सांडपाणी एका मोकळ्या भूखंडावर सोडले आहे. (वार्ताहर)
शरयूनगर अजूनही दुर्लक्षितच
By admin | Published: January 17, 2016 10:26 PM