नाशिक : ‘तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भूई, एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तीतील भावना उरी बाळगून शहर परिसरातील शेतकरी कुटुंबांनी आपल्या जगण्याचा आधार असलेल्या सर्जा-राजाला पोळा या सणानिमित्ताने पुरणपोळी भरवून पूजन केले. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावल्याने सुखावलेल्या बळीराजाने पोळा हा सण उत्साहात साजरा केला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाने पिचलेला व कर्जबाजारीपणामुळे जेरीस आलेल्या शेतकºयांनी त्यांना सुख-दु:खाच्या प्रत्येक प्रसंगात साथ देणाºया आपल्या जिवाशिवाच्या बैलजोडीला विविध रंग, फुगे व साजशृंगाराने सजवून गावातून पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणूक काढली. बैलांना मिरवणुकीद्वारे हनुमानाचे दर्शन घडवून आणल्यानंतर घरातील सौभाग्यवतींनी बैलांचे पूजन करून पुरणपोळी भरवली. यावेळी शेतकरी कुटुंबांतील लहान थोरांसह सर्वांनी आपल्या कुटुंबातीलच सदस्य मानलेल्या या सर्जा-राजा, ढवळ्या पवळ्याला वंदन करून त्याचे आभार मानले. दरम्यान, घरोघरी मातीच्या बैलांचे पारंपरिक पध्दतीने पूजन करण्यात आले.शहर परिसरातही मिरवणूकबैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रामकुं ड परिसरात, कृषीउत्पन्न बाजार समिती परिसरातही बैलांना सजवून मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे शहर परिसरातील म्हसरूळ, गंगापूर, सातपूर, अंबड, कामटवाडे, पाथर्डी, आडगावमध्येही बैलांची पारंपरिक पद्धतीने बैलांची सजावट करून बैलांचे पूजन करण्यात आले. शहर परिसरात शेतीच्या आधुनिकीकरणामुळे बैलांच्या संख्येत घट झाल्याने अनेक कुटुंबांतील महिलांनी घरासमोरून जाणाºया मिरवणुकीतील बैलांचे पूजन व औक्षण केले, तर काहींनी गावातील हनुमान मंदिरासमोर सलामीसाठी येणाºया बैलांना पुरणपोळी भरवून त्यांचे पूजन केले.ग्रामीण भागात पारंपरिक सजावटशहराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांनी बैलांच्या सजावटीसाठी रेशीम गोफ माथोटी, साधी माथोटी, गोफ कासरा, कवडीमाळ, घुंगरूमाळ, छंबी, शिंगाचे गोंडे, म्होरकी, झूल, पैंजण, चवर, गेरू, विविध प्रकारचे रंग अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा वापर केला. तसेच अंगावर झूल चढवून विविध रंगी ठिपक्यांनी बैलांची सजावट करण्यात आली. शहरातही घरोघरी पोळा सण उत्साहात साजरा झाला. नागरिकांनी मातीचे बैल व प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेले आकर्षक रंगकाम केलेले बैल खरेदी करून घराघरांत बैलपूजन करण्यात आले.
सर्जा-राजाची दिमाखात मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:02 AM