नाशिक : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कर्मचारी मानसिक तणावाखाली असल्याची लेखी तक्रार येताच त्याची शहानिशा करण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी सहायक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चोपडे यांच्याकडून याबाबत माहिती मागविल्याचे समजते. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्याची त्र्यंबकेश्वर येथे बदली झालेली असताना प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे अधिकारी महाशय गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात ठाण मांडून बसल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील तब्बल डझनभर कर्मचाऱ्यांनी सहायक प्रकल्प अधिकारी (पशुसंवर्धन) डॉ. संजय माळी यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षक संजय कुमावत यांच्यासह सुमारे १४ कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारीचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात संजय माळी यांचे कार्यालयात कामकाज व सहकाऱ्यांशी वागणे अर्वाच्च्य भाषेचे असून, अनेक कर्मचारी मानसिक दडपणाखाली काम करीत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख अरविंद मोरे यांचा मध्यंतरीच्या काळात अपघात झाल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे अपघातानंतर त्यांच्यावर कामकाजाचा फारसा बोजा न टाकण्याचे धोरण तेव्हाच्या व आताच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वीकारले होते. त्यातच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार ठराविकच एक -दोन कर्मचारी चालवितात, अशी ओरड आता सुरू झाली आहे.
‘त्या’ अधिकाऱ्याची माहिती मागविली केदा अहेरांचे आदेश : लेखी तक्रार प्रकरण
By admin | Published: December 10, 2014 1:12 AM