लासलगाव : सकाळी ११ वाजता दहावीचा हिंदी संयुक्त विषयाचा पेपर. त्याच्या आधी मध्यरात्री २ वाजता वडिलांनी जगाचा निरोप घेतला. याही परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत वडिलांच्या अंत्यविधीच्या अगोदर येथील जिजामाता कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी नंदिनी वाघ हिने दहावीचा पेपर दिला.‘बाबा मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करीन, नका ना सोडून जाऊ आम्हाला’ अशी आर्त हाक तिने बाबांना मारली आणि अंत्यविधीसाठी उपस्थित जनसमुदायाच्या अश्रूंचा बांध फुटला. शुक्र वारी (दि.६) मध्यरात्री दोन वाजता रमेश वाघ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घटना घडली त्यावेळी इयत्ता दहावीत असणारी त्यांची मुलगी नंदिनी दहावीची परीक्षा असल्याने अभ्यास करीत होती. वडिलांच्या झालेल्या अचानक निधनाचा तिला जबर धक्का बसला. सकाळी वडिलांचा अंत्यविधी करण्याच्या आधी ती दहावीचा पेपर देण्यासाठी थेट परीक्षा केंद्रावर गेली. तिच्या डोळ्यांतील अश्रू मात्र थांबत नव्हते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, शंतनू पाटील, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, मुख्याध्यापक सुधा आहेर, पर्यवेक्षक संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड तसेच निफाड पंचायत समिती सदस्य रंजनाताई पाटील व संस्थेच्या संचालक नीताताई पाटील यांनी नंदिनीस धीर देऊन पेपर देण्यास प्रोत्साहित केले. नंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, तिला एक बहीण व दोन भाऊ आहेत.
वडिलांच्या अंत्यविधीआधी तिने दिला दहावीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 11:36 PM