इगतपुरी : तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील चिंचलेखैरे येथे बिबट्याने पहाटेच्या सुमारास मंडलिक उघडे यांच्या घराशेजारील शेळ्यांच्या गोठ्यात हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडला. तालुक्यात बिबट्याची दहशत चिंताग्रस्त बनत चालली असून, कधी बिबट्या नागरिकांवर हल्ला तर कधी मुक्या जनावरांवर हल्ला करील याची शाश्वती राहिलेली नाही. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीच्या गोठ्यात जाऊन अचानक हल्ला केला, मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेळ्यांनी आरडाओरड आणि कुत्रे भुंकत असल्याने मंडलिक उघडे यांच्या पत्नी भोराबाई उघडे यांनी सर्व परिस्थितीचा अंदाज घेत बिबट्या आल्याचे लक्षात येताच मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने पलायन केले. दरम्यान, गेल्या पंधरवड्यात बारशिंगवे, आशाकिरणवाडी परिसरातदेखील युवकावर बिबट्याने हल्ला केला होता. ही घटना ताजी असताना आता आदिवासी, दुर्गम भागातील नागरिक प्रचंड भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. येथील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामुळे प्रचंड भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्या घरातदेखील शिरला होता. सुदैवाने कुणावरही हल्ला किंवा जीवितहानी टळली होती. मात्र आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने आदिवासी नागरिक भयभित झाले आहेत. दरम्यान, परिसरात वाढलेल्या बिबट्याच्या दहशतीला आळा घालण्यासाठी वनविभागाने या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)
बिबट्याकडून शेळीचा फडशा
By admin | Published: March 24, 2017 11:18 PM