इंदिरानगर : वालदेवी नदीच्या पात्रालगत पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात असलेल्या गोगली वस्तीवर बिबट्याने हजेरी लावून तीन शेळ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्या आल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात गोगली वस्तीवर शुक्र वारी (दि.२४) रात्री बारा वाजेच्या सुमारास वालदेवी नदीच्या लगत गोगली येथील संतू डेमसे यांच्या मळ्यातील गोठ्यात मोठा आवाज झाला. आवाजाने डेमसे कुटुंबीय झोपेतून जागे झाले व त्यांनी आरडाओरड केली. पहाटेच्या सुमारास डेमसे हे गोठ्यात गेले असता त्यांना तीन शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या मानेवर वन्यप्राण्याच्या दातांच्या खुणा असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाशी संपर्क साधत वनअधिकाऱ्यांना माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला असता बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे पुढे आले. वालदेवी नदीच्या काठाने बिबट्याचा सतत वावर असून, या भागातील मळे परिसरात बिबट्याचा शिरकाव होऊ लागल्याने रहिशांमध्ये भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने या परिसरात योग्य ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तहान, भूक भागविण्यासाठी बिबटे रात्री संचार करतात, त्यामुळे नागरिकांनी आपले पशुधन सुरक्षितरीत्या ठेवत गोठे बंदिस्त करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी अंगणात झोपणे मळे परिसरातील शेतकºयांनी टाळावे, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकेल.सुदैवाने दुर्घटना टळलीरात्रीच्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी डेमसे कुटुंबीय आपल्या लहान मुलांसह अंगणात रात्री झोपलेले होते. यावेळी बिबट्याने एका झाडावरून थेट त्यांच्या गोठ्याच्या पत्र्यावर उडी घेतली. यावेळी बिबट्याने अंगणात झोपलेल्या कुटुंबीयांकडे मोर्चा वळविला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. गोठ्यात बिबट्याला शेळ्यांच्या रूपाने सहजरीत्या खाद्य मिळाल्याने त्याने गोठ्यातून भूक भागवून पळ काढला.
वाडीच्या रानात बिबट्याकडून शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:28 AM