वणी : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर दाट धुक्याची चादर पसरली असून, नयनमनोहर दृश्यामुळे गडाचे अलौकिक सौंदर्य खुलून उठले आहे. सप्तशिखराच्या पर्वतरांगा भूभागापासून सुमारे तीन हजार मीटर अंतरावर असलेल्या गडाचे सौंदर्य पावसाळ्यात आकर्षित करीत आहे. गडासह परिसरात अद्याप म्हणावी तशी हजेरी पावसाने लावली नाही. पावसाच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत. पावसासाठी देवाला साकडे घातले जात आहे.सप्तशृंगी देवीचा आशीर्वाद व पर्जन्यराजाच्या कृपावृष्टीसाठी आकाशाकडे डोळे लावून प्रार्थना करण्यात येत आहे. गडावर काही दिवसांपूर्वी कोरोनाचे बाधित सापडल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. आजही खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेशबंदी आहेच. त्यामुळे गडावर निरव शांतता आहे. दरम्यान, गडावर पावसाळासदृश वातावरण असून, आकाशात काळे मेघ दिसत आहेत. पावसाचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे, मात्र समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. निसर्गसौंदर्याचा हा खजिना पर्यटनप्रेमींना खुणावत असला तरी प्रवेशबंदीमुळे गडावर जाता येत नाही. मात्र निसर्गसौंदर्याचा हा खजिना सोशल मीडियाच्या माध्यमातून डोळ्यात साठवून त्याचा मनमुराद आनंद घेण्यात येत आहे.
सप्तशृंगगडावर धुक्याची चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 9:55 PM