जायखेडा : द्याने (ता. बागलाण) येथील बोळाई शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर नामपूर येथील खासगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.द्याने येथील बोळाई शिवारातील शेतकरी अशोक भिवसन कापडणीस यांच्या कांद्याच्या शेतात मेंढपाळांचा वाडा मुक्कामी आहे. मेंढपाळ भुरा लहानू पधारे यांची पत्नी व लहान मुलगा बाहेरगावी गेले असल्याने ते रात्री आपल्या मेंढ्यांच्या कळपाजवळ झोपले होते. बुधवार २७ रोजी रात्री दीड ते दोनच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढविला. यावेळी मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज एकूण पधारे हे झोपेतून उठून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न करीत असतांना बिबट्याने मेंढपाळावर जोरदार हल्ला चढवून त्यांच्या डोळ्याजवळ व कपाळावर गंभीर इजा करून जखमी केले. बिबट्याच्या कचाट्यात सापडलेल्या मेंढपाळाने आपला जीव वाचविण्यासाठी जोरजोरात आकांता केल्याने शेतमालक अशोक कापडणीस, पंकज कापडणीस, केदा हलन्नोर, विठ्ठल कापडणीस, केदा कापडणीस हे धावून आले. त्यांनी विजेचा प्रकाश व आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला व सुदैवाने मेंढपाळाचे प्राण वाचले. मेंढपाळाच्या डोळ्याजवळ व शरीरावर ठिकठिकाणी गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नामपूर येथील खासगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. वनविभागाकडून प्रथमोपचारासाठी तातडीची मदत म्हणून पाच हजार रु पये देण्यात आले आहेत. बिबट्याच्या दहशतीने बोळाई शिवारातील शेतकरी, शेतमजूर प्रचंड घाबरले आहेत. यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्यात मेंढपाळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 2:33 PM