राजापूर : राजापूर परिसरात उन्हाचा तडाखा सोसत मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने त्याचा फटका मेंढपाळांनाही बसला आहे.गावबंदी, सीमाबंदी, जिल्हाबंदी यामुळे चारा-पाण्याच्या शोधात बाहेर पडता येत नाही. परिणामी जवळपास आहे त्या व तशा चारा-पाण्यात मेंढ्यांची भूक भागवावी लागत आहे. तसा राजापूर व परिसर डोंगराळ भाग. वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच या भागातील जलस्रोत कोरडे होतात, माणसांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. त्यात पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न टांगताच राहतो.बहुत्वांशी मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात आपल्या कुटुंब किबल्यासह भटकंतीवर जातात. परंतु कोरोनामुळे सर्वच लॉकडाउन झाले. बाहेरगावी न जाता मेंढपाळ परिसरातच आपल्या मेंढ्यांना घेऊन त्यांची चारा-पाण्याची भूक भागवत आहे. परिसरात सध्या उन्हाळ कांदा काढणी सुरू असून, कांदापातीवर मेंढ्यांची भूक भागविली जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेंढपाळांमध्येही जागृती दिसून येत आहे. मेंढपाळ कुटुंब तोंडावर मास्क वा रुमाल बांधून मेंढ्या चारताना दिसतात. याबरोबरच मेंढपाळ कुटुंबही सॅनिटायजर, रुमाल, मास्क आदी वापरून आपली व इतरांची काळजी घेत आहेत.
उन्हाच्या तडाख्यातही मेंढपाळांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:50 PM