नितीन बोरसे सटाणाबागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पठावे दिगर गटात गेल्या दशकांपासून ताब्यात असलेला गड राखण्यासाठी राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादीबरोबरच भाजपा, बहुजन समाज पार्टीने उडी घेतल्याने हा सत्तासंघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.आदिवासी पश्चिम पट्ट्यातील पठावे दिगर गट हा ८५ टक्के आदिवासींचा रहिवास असलेला परिसर आहे. या भागात कोकणा व भिल्ल या दोन आदिवासी समाजाचे अस्तित्व असले तरी कोकणा समाजाचे अधिक वर्चस्व राहिले आहे. लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील यांचा प्रभाव असल्यामुळे दीर्घकाळ कॉँग्रेसची चलती राहिली आहे.कालांतराने शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना केल्यामुळे साहजिकच माजी मंत्री ए. टी. पवार, माजी आमदार संजय चव्हाण यांचा प्रभाव वाढला. सन २००७ च्या निवडणुकीत तब्बल दहा वर्षे मिनी मंत्रालयात या भागाचे प्रतिनिधित्व करणारे कॉँग्रेसचे पोपट गवळी यांना नमवत राष्ट्रवादीचे पोपट अहिरे यांनी गड जिंकला. आदिवासी भागात राष्ट्रवादीची एण्ट्री झाल्यामुळे पक्षाने अहिरे यांना समाज कल्याणचे सभापतिपद दिले. त्यानंतर डांगसौंदाणे येथील तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी त्यांच्या सौभाग्यवती सिंधूताई यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा गड राखला. यंदाच्या निवडणुकीत हा गट खुला झाल्यामुळे संजय सोनवणे यांनी तयारी केली आहे.पक्षानेही आपला गड शाबूत ठेवण्यासाठी सोनवणे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकून एक तगडा उमेदवार पक्षाने गळाला लावला. भरीव विकासकामांच्या जोरावर सोनवणे मैदानात उतरले आहेत, तर राष्ट्रवादीचा वारू रोखण्यासाठी एकच उमेदवार देण्यासाठी आदिवासींनी एकत्र येऊन आदिवासी विकास आघाडी स्थापन केली. माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे चिरंजीव गणेश यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. सर्वच पक्षाच्या आदिवासींनी गणेश अहिरे यांना बाय दिला असताना कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांनी अहिरे यांच्या अर्जासोबत पक्षाचे तिकीट जोडल्याने इतर पक्षांचे आदिवासी नेते नाराज होऊन एकवटलेल्या आदिवासी आघाडीला फुटीचे कारण बनले. त्यामुळे ऐनवेळी भाजपाने संघ परिवारातील आरोग्य सेवेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले भाटेंबा येथील मन्साराम वेडू गावित यांना तिकीट दिले, तर बहुजन समाज पार्टीने करंजखेड येथील शिवदास महादू सोनवणे यांना उमेदवारी बहाल करून आदिवासी आघाडी समोर आव्हान उभे केले आहे. या सर्वांच्या लढाईत ताहाराबाद गटातील मुल्हेरचे उपसरपंच सुभाष येवला, डांगसौंदाणे येथील संजय नारायण देखमुख हे अपक्ष उमेदवारी करून नशीब आजमावत आहेत.
सत्तासंघर्ष पोहोचला शिगेला
By admin | Published: February 19, 2017 1:36 AM