शिवकथा श्रवणासाठी भाविकांची गर्दीत्र्यंबकेश्वर : येथील जव्हाररोडवर गुरू काष्र्णी कुंभमेळा शिबिरात महाशिवपुराणाची कथा आंतरराष्ट्रीय कथाकार रमेशभाई ओझा यांच्या अमृतवाणीद्वारे सांगितली जात असून, मोठय़ा संख्येने भाविक हजेरी लावत आहेत. शिवपुराण कथेच्या प्रवचनात रमेशभाई ओझा म्हणाले की, आपण जेव्हा पूजा, अर्चना, नामस्मरण, ध्यान आदिंसाठी देवासमोर बसतो तेव्हा आपले लक्ष दुसरीकडे असणे अयोग्य मानले जाते. त्यावेळी आपण जगरहाटी विसरून देवाच्या पायाशी लीन झालेले असलो पाहिजे. तेव्हाच तुमची ईश्वर आराधना सफल होऊ शकते. आपल्या अमृतवाणी आणि रसाळ विवेचनाद्वारे त्यांनी भगवान शंकराच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि त्याचे महत्त्व विशद केले. यावेळी गुरू काष्र्णी आश्रमाचे स्वामी गुरू शरणानंद यांच्या समवेत ज्ञानानंद महाराज, श्यामसुंदरदास महाराज, परमानंद महाराज, स्वामी अद्वैतानंद महाराज यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. मंगळवार, दि. १ सप्टेंबरपासून रमेशभाई ओझा यांच्या अमृतवाणीत हे शिवपुराण अर्थात शिवकथा सुरू असून, मोठय़ा संख्येने भाविक लाभ घेत आहेत.
शिवकथा श्रवणासाठी भाविकांची गर्दी
By admin | Published: September 07, 2015 10:05 PM