नाशिक : गणेश विसर्जन मिरवणूकप्रसंगी ‘डॉल्बी डीजे’चा वापर करत आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी तसेच पोलीस अधिकाºयांच्या सूचनेला न जुमानता मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करत दंडे हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल ऊर्फ बबलू शेलार यांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी (दि.५) ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ९७.०२ डेसिबलच्या पुढे ‘डॉल्बी’चा आवाज वाढविला. यामुळे ध्वनिप्रदूषण व पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन दंडे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले. सदर बाब बंदोबस्तावरील पोलीस अधिकाºयांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित मंडळाचे अध्यक्ष शेलार यांना पोलिसांनी सूचना देऊन ध्वनिप्रदूषणाची जाणीव करून दिली; मात्र त्यांनी सूचनांकडे दुर्लक्ष करणे पसंत करत पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशान्वये ‘डॉल्बी’ मालकासह मंडळाचे पदाधिकारी तथा नगरसेवक गजानन शेलार व अध्यक्ष बबलू शेलार यांच्याविरुद्ध भद्रकाली तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच ‘डॉल्बी’चा ट्रकही पोलिसांनी जप्त केला होता. या गुन्ह्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अखेर कारवाई करत शेलार तसेच मंडळाचा खजिनदार योगेश जवाहरलाल मदरेले, अक्षद अनिल कमोद, ‘डॉल्बी’चा मालक गणेश तोरे या चौघांना गुरुवारी (दि.७) दुपारी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. लोखंडे करीत आहेत.
दंडे हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष शेलार यांच्यासह तिघांना ‘डॉल्बी’ भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:04 PM