मुंबई - राज्यातील सत्तासंर्षावर गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू असलेली सुनावणी आज गुरुवारी संपली. दोन्ही गटांच्या वकिलांनी राज्यघटनेतील तरतुदी व जुन्या निकालांचे दाखले देत आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आता, शिंदे गटाच्या १६ सदस्यांच्या अपात्रतेचा काय निकाल लागेल, यावर सारे अवलंबून राहणार आहे. दोन्ही गटाचे युक्तिवाद संपल्यानंतर घटनापीठाने निर्णय राखून ठेवला. त्यामुळे, सर्वांनाच या निकालाची उत्सुकता असताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गंभीर विधान केलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंना निकालाची चिंता आहे, त्यांच्याकडून हाही निकाल विकत घेता येतो का, याची तयारी सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद आता सर्वोच्च टोकाला पोहोचला असून दोन्ही गटाचे प्रवक्ते एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच, राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी यांसह विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारला घेरण्यात येत आहे. अवकाळीच्या मुद्द्यावरुन आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केलीय.
या सरकारवर निसर्गही कोपलाय, शेतकरी हवालदिल असून आक्रोश करतोय. सरकार तोडबाजीमध्ये रमलंय, विरोधकांच्या नाड्या आवळण्यात रमलंय, पण शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळलाय त्याकडे पाहत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. केवळ गटातटांकडेच ते पाहत आहेत, त्यांना खुश करण्यातच यांचा वेळ जातोय. मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र तरी माहिती आहे का, मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत, त्यांना उद्योजकांचे प्रश्न माहिती आहेत का हाही प्रश्न आहे. दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही असंच आहे. मुख्यमंत्र्यांना चिंता आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागणार. मुख्यमंत्र्यांना चिंता वाटतेय की, निवडणूक आयोगाप्रमाणे आम्ही हा निकालसुद्धा विकत घेऊ का, त्याची त्यांची संपूर्ण तयारी सुरूय, असा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलाय.
हीच त्यांची लायकी
दरम्यान, महाराष्ट्राला न्याय मिळेल, शिवसेनेला न्याय मिळेल आणि मराठी माणसालाही न्याय मिळेल, असा विश्वासही राऊत यांनी वर्तवला. तसेच, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागावाटपाच्या विधानावरुनही राऊत यांनी शिंदेंवर जोरदार प्रहार केला. हीच त्यांची लायकीय, भाजपने त्यांच्याकडे तुकडे फेकले, हे सगळे मिंधे लोकं फेकलेल्या तुकड्यांवर जगणार आहेत. भाजपवाले उद्या त्यांना केवळ ५ जागाच देतील, असे राऊत यांनी म्हटले.
गेल्या २३ ऑगस्टला हा खटला पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने घेतला. तेव्हापासून या खटल्याची सुनावणी घटनापीठापुढे सुरू आहे. घटनापीठात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्याशिवाय न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.