नाशिक (सुयोग जोशी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमची कामे होत नाही, फायली मंजुर केल्या जात नाही, आम्हाला निधी दिला जात नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली, त्यानंतर शाह यांनी शिंदे यांना दिलेल्या उत्तराचा सस्पेन्स कायम ठेवत शहा यांनी दिलेलं उत्तर समोर येईल तेव्हा राज्याचं चित्र स्पष्ट होणार असल्याचा दावा उद्वसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
नाशिक येथे उद्धवसेनेचे बुधवारी (दि.१६) मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांना पडतो. तुमचे ५-२५ आमदार हे फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले.
या राज्याची परवानगी तुम्हाला हवी आहे का? यावरचं शाह यांनी काय उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. शिंदे यांनी टुमणं लावलं तेव्हा शाह यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी राऊत यांना तुम्हाला कोण माहिती देतं याबद्दल विचारल्यावर, माझं नाव संजय राऊत आहे, हा संजय महाभारतातही होता. जो सर्व चित्र डोळ्यात कानात साठवायचा, आमच्याकडे लोकं आहेत ना, ते महत्त्वाचे लोक आहेत. आगामी काळात भाजप बरोबर सत्तेत जाणार नाही तर सेना स्वतः सत्तेत येईल असे त्यांनी सांगितले आहे.राज्याची आर्थिक स्थिती खालावलीलाडक्या बहिणींना सरकारने १५०० रूपये देणे सुरू केले होते. ज्या लाडक्या बहिणींकडून १५०० रूपयांच्या बदल्यात मते विकत घेतलीत त्याच मतांची किंमत आता ५०० वर आली आहे. उद्या ती आता शून्यावर येईल. पैसे कमी का केले असा प्रश्न लाडक्या बहिणींना सरकारला विचारावा असे सांगत राऊत यांनी या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, सरकारी कर्माचाऱ्यांते पगार द्यायला पैसे नाहीत. सरकारने कितीही मोठ्या वल्गना कराव्यात, आव आणावा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नसल्याचे टिकास्त्र राऊत यांनी सोडले.