निशाचर पक्ष्यांपैकी एक म्हणून घुबड ओळखले जाते. महाराष्टातील पश्चिम घाटापासून तर थेट गोव्यापर्यंत शिंगळा घुबडाचा वावर आढळून येतो. उत्तर महाराष्ट्रातसुद्धा या पक्ष्याचे वास्तव्य अजूनही टिकून असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे.
शिंगावे गावातील प्राणीमित्र दीपक पाटील यांना एका मोठ्या वृक्षाच्या बुंध्याजवळ एक घुबड निपचित पडलेले दिसले होते. त्यांनी याबाबतची माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन फोरमचे वन्यजीवप्रेमी अभिजित पाटील, राहुल कुंभार यांना कळविली. माहिती मिळताच या दोघांनी त्या पिलाला रेस्क्यू करत वन विभागाला माहिती दिली. तत्कालीन वनक्षेत्रपाल पी.डी. खैरनार यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश बारी यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या सल्ल्यानुसार घुबडाच्या पिलाची ४८ दिवस सुश्रूषा केल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात वन विभागाकडून मुक्त करण्यात आले.
--इन्फो---
देसाई, वडतकर यांनी पटविली ओळख
शिरपूरमध्ये आढळून आलेल्या या घुबडाच्या प्रजातीच्या पिलाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. पिलू असल्यामुळे त्याची ओळख पटविणे कठीण होते. जळगाव येथील मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई व अमरावतीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. जयंत वडतकर या अभ्यासकांनी त्याची ओळख पटविली. त्यावेळी ते शिंगळा घुबड असल्याचे लक्षात आले. इला फाउंडेशनच्या ‘इला जर्नल ऑफ फॉरेस्ट्री-वन्यजीव’ या शोधनिबंधामध्ये यास स्थान देण्यात आले आहे.
---कोट--
शिंगळा घुबडाचा आवाज ही त्याची मुख्य ओळख आहे. या पक्ष्याला आवाजावरून ओळखता येते. या पक्ष्याच्या संख्येविषयी सध्या तरी चिंतेची बाब नाही. पश्चिम घाट परिसरात हा पक्षी बऱ्यापैकी आढळून येतो. हा निशाचर असल्यामुळे सहजासहजी लोकांच्या नजरेस पडत नाही. घुबडाची ही प्रजाती अत्यंत दुर्मीळ आहे, असे नाही.
- डॉ. गिरीश जठार, सहायक संचालक, बीएनएचएस