नाशिक - जिल्ह्यातील पंधरा मतदार संघात उद्या होणा-या मतदानासाठी प्रशासकिय सज्जता पूर्ण झाली असून आज दिवसभर विविध मतदान केंद्रांसाठी साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले. शहरातील शासकिय कन्या विद्यालय, दादासाहेब गायकवाड सभागृह, ठाकरे स्टेडीयम, संभाजी स्टेडीयम येथून कर्मचाऱ्यांनी साहित्य घेऊन नंतर ते रवाना झाले. याशिवाय बीएलओंमार्फत मतदारांच्या चिठ्या पोहोचण्याचे काम जोमाने सुरू असून अनेक उमेदवारांनी देखील मतदार चिठ्ठया पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे.
नाशिक जिल्ह्यात एकुण १५ विधान सभा मतदार संघ असून त्यात १४८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकुण ४५ लाख २४ हजार मतदार असून त्यात २३ लाख ७६ हजार ४०५ पुरूष मतदार आहेत. तर २१ लाख ६८ हजार ३०९ महिला मतदार आहेत. दिव्यांगांना मतदान करता यावे यासाठी साडे चारशे व्हील चेअरची सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकुण ४ हजार ५७९ मतदान केंद्रे आहेत. त्यातील २५६ मतदान संवदनशील आहेत. तर ४५८ मतदान केंद्रांवरून थेट वेबकास्टींगच्या मदतीने हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी पाण्यापासून प्रथमोपचारापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात मतदान शांतते पार पडावे यासाठी पोलीसांनी विशेष दक्षता घेतली आहे. मालेगाव आणि निफाड येथे ड्रोनच्या माध्यमातून दाट वस्तीच्या मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर सशस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी सशस्त्र पोलीस दलाच्या ११ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात ४५० गुन्हेगार तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार करण्यात आले आहेत. या सर्व तयारीनंतर देखील शहारात नाकाबंदी करून पोलीस यंत्रणेमार्फत विशेष दक्षता घेतली जात आहे.