दत्ता दिघोळेनायगाव : छत्रपती शिवरायांचा जयघोष परदेशात दक्षिण आफ्रिकेमध्येही घुमला. सह्याद्रीच्या या शिवप्रेमी मावळ्यांनी टांझानियामधील सर्वात उंच माउंट किलीमांजरो पर्वताच्या शिखरावर शिवजयंती साजरी करून तमाम शिव-भक्तांबरोबर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या मोहिमेतील क्षितिज अनिल नांदोडे (भावसार) याने नाशिकचे नाव रोशन केले आहे. जगातील सर्वोच्च सात शिखरांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील ५,८९५ मीटर उंचीच्या माउंट किलीमांजरो पर्वताच्या माथ्यावर गिर्यारोहकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला. अनिल चंद्रकांत वाघ (३३), क्षितिज अनिल भावसार (नांदोडे, २७) रवि मारुती जांभूळकर (३०), आणि कोल्हापूर येथील प्रवीण चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी ही धाडसी मोहीम फत्ते केली. या प्रवासाबद्दल बोलताना रवि जांभूळकर व क्षितिज नांदोडे म्हणाले की, शिखर चढणे व उतरणे अशी एकूण सहा दिवसांची ही मोहीम होती. मुंबईतून दक्षिण आफ्रिकेला रवाना झालो. दक्षिण आफ्रिका, टांझानिया येथील सर्वात उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस खूप कमी गिर्यारोहकांनी दाखविले आहे. दि. १६ फेब्रुवारीला आम्ही किलीमांजरो नॅशनल पार्क येथून मोहिमेस सुरुवात केली, पहिला मुक्काम मदर हटला नऊ किलोमीटरचे पदभ्रमण करून विश्रांती घेतली. दुसºया दिवशी पहाटे दि. १७ फेब्रुवारीला पुढील वाटचाल चालू केली. जवळपास ११ किलोमीटर अंतर कापून आम्ही होरोम्भो हटला मुक्काम केला. दि. १८ फेब्रुवारीला आम्ही खूब हटला पोहचलो व रात्री १२ वाजेपर्यंत आराम करून रात्री १ वाजता पदभ्रमण चालू करून शेवटच्या टप्प्याकडे प्रस्थान केले. पहाटे ७ वाजता सर्वोच्च माथ्यावर पाऊल ठेवले. सह्याद्रीच्या या मावळ्यांनी शिवजयंतीच्या दिवशी येथे छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करून अभिवादन केले. या मोहिमे-साठी बेंगलोर माउंटिंग क्लबचे नीरज माळवे व कीर्ती ओसवाल यांचे मार्गदर्शन केले. क्षितिजसह सर्व सहकारी बुधवारी (दि. २८) मुंबई विमानतळावर येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील पर्वतावर शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:15 AM