नाशिकमध्ये समांतर काँग्रेसमुळे दोन वेळा शिवजयंती; आकाश छाजेड यांच्या नियुक्तीने वाद
By संजय पाठक | Published: February 19, 2023 06:06 PM2023-02-19T18:06:55+5:302023-02-19T18:07:24+5:30
आज सकाळी छाजेड यांनी समर्थकांसह शिवजयंती साजरी केली, मात्र, त्याला अनुपस्थित नाराज गटाने पुन्हा त्याच ठिकाणी अभिवादन करून दुसऱ्यांदा जयंती साजरी केली.
नाशिक- तब्बल सात वर्षे प्रभारी शहराध्यक्ष राहीलेल्या शरद आहेर यांना हटवून माजी शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांचीच पुन्हा वर्णी लावल्याने काँग्रेस पक्षात गटबाजी उफाळली असून पुन्हा एकदा समांतर काँग्रेसचे कामकाज सुरू झाले आहे. आज सकाळी छाजेड यांनी समर्थकांसह शिवजयंती साजरी केली, मात्र, त्याला अनुपस्थित नाराज गटाने पुन्हा त्याच ठिकाणी अभिवादन करून दुसऱ्यांदा जयंती साजरी केली.
यापूर्वी ॲड. आकाश छाजेड हे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक असताना असलेल्या वादामुळे त्यांनी शहराध्यक्षपद सोडले. त्यांच्या ऐवजी शरद आहेर यांना तब्बल सात वर्षे प्रभारी शहराध्यक्ष नियुक्त करण्यात आले. आता गेल्या आठवड्यात पुन्हा छाजेड यांचीच वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद पेटला आहे.
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ॲड आकाश छाजेड तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राहूल दिवे, ज्येष्ठ माजी नगरसेविका वत्सला खैरे, समीर कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, साडे अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा नाराज गटाने काँग्रेस भवनात येऊन जयंती साजरी केली. यात शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, शाहु खैरे, सुरेश मारू यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.