नाशिक : महापौरपदाच्या निवडणुकीत बहुमत असतानाही भाजपला फाटाफुटीची धास्ती असल्याने नगरसेवकांना सहलीवर नेण्यात आले आहे. तथापि, सात नगरसेवक पक्षाच्या संपर्काबाहेर असल्याने पक्षाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे राज्यातील शिवआघाडीचा प्रयोग नाशिकमध्ये करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे फाटाफूट टाळण्यासाठी या पक्षानेदेखील शनिवारी नगरसेवक बाहेरगावी रवाना केले.महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी होणार आहे. भाजपचे ६५ नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने बाळासाहेब सानप यांना पुन्हा उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यामुळे त्यांचे समर्थक फुटण्याची भाजपला धास्ती आहे. शिवसेनेचे ३५ तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष यांचे एकूण ५५ नगरसेवक होत असल्याने भाजपातील सात ते आठ नगरसेवक फुटले तरी सत्तांतर होऊ शकते.भाजपमधील महापौरपदासाठीच्या मातब्बर इच्छुकांनी महाशिवआघाडी होऊच नये आणि झालीच फाटाफूट व्हावी यासाठी शिवसेना व अन्य काही पक्षांचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्यामुळे शिवसेनेनेदेखील सायंकाळी सातपूर येथून नगरसेवक बाहेरगावी रवाना केले.
महापौर निवडणुकीत शिवआघाडीचा प्रयोग?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 3:18 AM