सारांशनिवडणुकीच्या रणांगणात उतरताना मतदारांचा विचार करण्यासोबतच बंडखोरांचाही अंदाज घेऊन व्यूहरचना करायच्या असतात. त्यासाठी अधिकवेळ जाऊ देणेही इष्ट नसते; अन्यथा आत्मविश्वास बळावलेले बंडखोर माघारायचे सोडून त्रासदायी ठरल्याशिवाय राहत नाही. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर अशी बंडखोरी समोर आली आहे. यात शिवसेनेला पक्षांतर्गत अडथळे दूर करण्यात यश आले असले तरी, भाजपाला ते अद्याप जमलेले नाही. ‘युती’साठी तीच बाब चिंतेची, तर आघाडीच्या अपेक्षा उंचावून देणारी आहे.नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही, म्हणजे नाशिक व दिंडोरीसह तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या धुळे मतदारसंघातील निवडणूक अधिसूचना २ तारखेला लागू होणार असली तरी, सध्याच्या प्राथमिक अवस्थेत पक्षीय उमेदवारांखेरीज रिंगणात राहणाऱ्या अन्य अपक्षांचीच किंवा तिकीट हुकलेल्या नाराजांचीच चर्चा प्रकर्षाने होताना दिसत आहे. बरे, ‘युती’ असो की ‘आघाडी’, दोन्हींकडे ठिकठिकाणी मनोमीलनासाठीच्या बैठका होत असताना या बंडखोरांना कुणी थांबवण्याचाही प्रयत्न करताना दिसत नाही. अर्थात, हे बंडखोर थांबविल्याने थांबणार आहेत का? हाच खरा प्रश्न आहे.विशेषत्वाने ‘आघाडी’त उमेदवारीवरून फारशी खळखळ नाही. नाशकात राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांच्याविषयी काँग्रेस नेत्यांमध्ये काहीशी नाराजी होती; पण ती तशी दखलपात्र नव्हती. दिंडोरीत नाराजीतून ‘एक्स्चेंज’ आॅफरच घडून आली. डॉ. भारती पवार यांना अपेक्षित राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी थेट भाजपाचाच झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीने तिकीट दिलेल्या धनराज महाले यांच्याबाबत फारसे कुणाचे काही आक्षेप नाही. अडचण आहे ती ‘युती’च्या उमेदवारांची, कारण नाशकात शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्यासमोर भाजपाची उमेदवारी हुकल्याने स्वतंत्रपणे अपक्ष लढण्यासाठी शड्डू ठोकलेल्या माणिकराव कोकाटे यांनी अडचण करून ठेवली आहे, तर दिंडोरीत भाजपाच्या उमेदवाराला विरोधकाऐवजी भाजपाच्याच माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नाराजीचा सामना करण्याची वेळ आली आहे.कोकाटे यांनी प्रचारास सुरुवात करून देत शक्तिप्रदर्शन चालविले आहे, तर चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांच्या बैठका होत असून, त्यांनी पालकमंत्र्यांवरच शरसंधान करीत भाजपामध्ये चमच्यांचे टोळके कार्यरत असल्याचा आरोप केला आहे. अर्थात, अपक्ष उमेदवारी करणे जोखमीचे असल्याची जाणीव त्यांना असल्याने लढायचे नाही; पण पाडायचे, अशा भूमिकेतून चव्हाण यांची वाटचाल सुरू आहे.महत्त्वाचे म्हणजे, भाजपापेक्षा शिवसेनेत स्वबळाची भावना तीव्र होती व नाशकात विद्यमान खासदार गोडसे यांची उमेदवारी घालवण्याची तयारी स्वकीयांनीच जोमात केली होती. पण, ‘मातोश्रीं’नी कान पिळल्यावर आप्पा झाले गप्प आणि मुकाट्याने ‘युती’च्या मनोमीलनाच्या बैठकीत मांडी घालून बसलेले दिसले. दुसरेही एक आप्पा होते सिडकोतले, त्यांनीही हूल दिली होती उठवून; मात्र प्रारंभापासूनच भुजबळांच्या खिशातले गणले जात असल्याने ते दखलपात्र ठरलेच नव्हते. त्यामुळे शिवसेनेतील उमेदवारी न मिळालेल्यांची नाराजी मुळात टिकून राहू शकणारी नव्हतीच. तरीदेखील मुंबईतून त्याची दखल घेतली गेल्याने घरातला विरोध मावळला. तो खरच शमला का? किंवा अंतस्थपणे प्रवाहित राहून दगाफटका तर करणार नाही, हे नंतर लक्षात येईलही. पण आज चित्र आलबेल झाले.भाजपा मात्र कोकाटे व चव्हाणांच्या भूमिकांमुळे भांबावली आहे, कारण या दोघांचे असलेले वा नसलेले स्वबळ युतीच्या उमेदवारांसाठीच घातक ठरू शकणारे आहे. टोकाला गेलेले मतभेद विसरून शिवसेना ही भाजपासोबत आली आणि आता या भाजपालाच त्यांच्या कोकाटे यांना थांबवता येत नसल्याने गोडसे अडचणीत येऊ पाहत आहेत, तर तिकडे तीन टर्म खासदारकी भूषविलेल्या चव्हाणांच्या हालचालींकडेही दुर्लक्ष केले गेल्याने तेही रागात आहेत. पक्ष सोडून जाऊ पाहणाऱ्यांना मनावर न घेतल्याने ‘मनसे’चे नाशकात पुढे कसे पानिपत झाले हे समोर असताना भाजपाचे वरिष्ठही कोकाटे-चव्हाण यांना मनावर घेत नसल्याने ही अडचण वाढून गेली आहे.
शिवसेनेने नाराजी निस्तरली; भाजपातील बंडखोरांचे काय?
By किरण अग्रवाल | Published: March 31, 2019 1:47 AM
जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांपुढे भाजपाच्याच बंडखोरांचे आव्हान उभे राहू पाहत असताना पक्षश्रेष्ठी गप्प आहेत याचा अर्थ कोकाटे व चव्हाण यांची भाजपाच्या दृष्टीने उपयोगिता संपली असावी किंवा त्यांची मनधरणी करून त्यांना थांबविण्याइतपत ते दखलपात्र वाटत नसावेत. यापैकी काहीही असो, त्यामुळे युतीलाच धोका मात्र वाढून गेला आहे.
ठळक मुद्देबंडखोरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण घातक ठरण्याची चिन्हेशिवसेनेला पक्षांतर्गत अडथळे दूर करण्यात यश ‘आघाडी’त उमेदवारीवरून फारशी खळखळ नाही.