नाशिक : मूळ आक्रमकता आणि संघटन कौशल्य सोडून शिवसेना भलत्याच पंथाला लागली की काय, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. इंधन दरवाढीसह अनेक विषयांवर अन्य पक्ष आंदोलन करत असताना आक्रमक सेना मात्र केविलवाणी होऊन सांस्कृतिक कार्यक्रम करू लागली आहे. व्हाइस आॅफ नाशिकच्या माध्यमातून आवाज कोणाचा शोधू लागल्याने शिवसैनिकात हा चर्चेचा विषय ठरला आहे.शिवसेनेत मोठे फेरबदल झाल्यानंतर नवा गडी नवा राज म्हणून शिवसेनेचे पाटलेले रूप दिसेल असा कयास बांधला जात होता. प्रत्यक्षात मात्र एकाचे दोन महानगरप्रमुख होऊनदेखील तशी चमकदार कामगिरी दिसत नाही. यापूर्वी विरोधकांच्या बरोबर सत्तारूढ भाजपाशी पंगा घेणारी सेना आता मात्र कोणत्याही विषयावर आंदोलन करण्यास तयार नाही. राष्टÑवादी आणि कॉँग्रेसने इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. मर्यादित आवाका असला तरी किमान जनतेच्या बरोबर आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. राफेल विमान खरेदी घोटाळ्याचे निमित्त करून कॉँग्रेसने मोहीम चालवली आणि एचएएलला चुचकारण्याचा प्रयत्न केला. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने संविधान बचाव देश बचाव आंदोलन केले शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर करवाढीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. परंतु शिवसेना मात्र असे काहीच करण्याच्या तयारीत नाहीत.महानगरप्रमुखांनी कार्यकारिणी तयार करून ती वरिष्ठांकडे पाठविली परंतु त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही. सेनेची कार्यकारिणी सामनामधून प्रसिद्ध झाल्यानंतर ती अधिकृत मानली जाते. मात्र तसे न होताही ज्यांची नावे केवळ सुचविण्यात आली आहेत, अशा कार्यकर्त्यांनी होर्डिंग्जवर परस्पर आपली पदेही जाहीर करून टाकल्याने शिवसेनेचा संघटनात्मक म्हणून धाक राहिलेला नाही. पक्षीय अंतर्गत करण्यासही उत्सुकता नाही. दोन दिवसांपूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती होती, परंतु तीदेखील साजरी न झाल्याने जुन्या शिवसैनिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेकडे सभासद नोंदणीचे अर्ज दाखल झाले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून महानगर शिवसेना ‘व्हाइस आॅफ नाशिक’ ही गायनाची स्पर्धा घेऊन नाशिकच्या आवाजाचा शोध घेत आहे. मात्र दुसरीकडे आवाज कोणाचा...?असा प्रश्न करणाऱ्या शिवसेनेचाच आवाज क्षीण झाला असल्याची चर्चा होत आहे.सुनील बागुल आयेंगे...शिवसेनेची अवस्था बिकट होत असतानाच अनेकांना पक्ष संघटन बळकट करण्यासाठी माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांच्या घरवापसीचे वेध लागले आहेत. पारिजातनगर येथील शिवसेना पदाधिकारी प्रकाश पवार यांनी, तर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतानाच सुनील बागुल यांची छबी लावली असा प्रकार अनेक ठिकाणी असल्याचे सांगण्यात येत असून, पक्षप्रमुखांची इच्छा असो वा नसो बागुल यांना पक्षात पुन:प्रवेश देण्यासाठी एक गट प्रचंड प्रयत्न करत आहे.केवळ बोलबच्चनच !महापालिकेत विरोधी पक्षनेत्यासारखे प्रभावी पद असताना तेथेही शिवसेनेचा आवाज दबला असल्याचे दिसून येते. केवळ पत्रकार परिषद घेऊन विरोध करण्यापलिकडेदेखील विरोधी पक्षनेतादेखील कृतिशील नाही. त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहेरा हरविल्याचे दिसत आहे.
शिवसेना विचारते ‘आवाज कोणाचा...?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:31 AM