नाशिक : शिवसेनेच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सचिन मराठे व महेश बडवे या दोघांच्या पदग्रहण सोहळ्याला आजी माजी जिल्हा प्रमुखांसह जुन्या शिवसैनिकांनी लावलेली हजेरी व दोघा महानगर प्रमुखांच्या स्वागतासाठी जमलेल्य हजारो सैनिकांमुळे शिवसेनेत जल्लोष निर्माण झाला असून, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेना भवनासमोर फटाक्याच्या आतषबाजीत व ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने नव नियुक्तांचे स्वागत करण्यात आले आहे.एरव्ही शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर खांदे पालट झाल्यानंतर पदावरून गच्छंती झालेल्या पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण होणारी नाराजी व त्यातून गटबाजीमुळे नव नियुक्त पदाधिकाऱ्याला पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच गटबाजीचा सामना तसेच राजी-नाराजी घालविण्याचे प्रयत्न करावे लागत. शिवाय नव नियुक्त पदाधिकारी कोणाच्या गटाचा यावरच त्याला समर्थन वा सहकार्य करण्याची भुमिका ज्येष्ठ आजी माजी पदाधिका-यांकडून केली जात होती. परंतु आजवरच्या या सर्व गोष्टीला सोमवारी फाटा देण्यात आला. पक्षाने मुळ शिवसैनिक असलेल्या सचिन मराठे यांना महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याने त्यांच्या स्वागतासाठी पहिल्यांदाच दत्ता गायकवाड, विनायक पांडे व जयंत दिंडे या तीन माजी जिल्हा प्रमुखांनी आवर्जुन हजेरी लावली त्याच बरोबर एकेकाळी सुनील बागुल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणा-या मंगला भास्कर, प्रेमलता जुन्नरे, कोकीळा वाघ या जुन्या महिला सैनिकांची उपस्थिती बरीच काही सांगून गेली. काळानुरूप स्थानिक सेनेत झालेल्या उलथापालथीमुळे पदाधिका-यांपासून दुरावलेले परंतु मनाने सेनेतच असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी देखील या सोहळ्यास हजर राहिल्याने शिवसेनेचे कार्यालय ब-याच कालावधीनंतर खच्चून गर्दीने भरले होते. विशेष म्हणजे मावळते महानगरप्रमुख अजय बोरस्ते व जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी नव नियुक्तांना संपुर्ण सहकार्य करण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे. सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी नवीन महानगरप्रमुखांच्या पदग्रहणाला उपस्थित राहण्याची ही देखील पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
नाशिकमध्ये सेनेत खांदेपालक होताच शिवसेना भवन गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:19 PM
एरव्ही शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर खांदे पालट झाल्यानंतर पदावरून गच्छंती झालेल्या पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण होणारी नाराजी व त्यातून गटबाजीमुळे नव नियुक्त पदाधिकाऱ्याला पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच गटबाजीचा सामना तसेच राजी-नाराजी घालविण्याचे प्रयत्न करावे लागत
ठळक मुद्देजुन्या सैनिकांनी चढली पायरीमाजी जिल्हाप्रमुखांची हजेरी : आजी पदाधिकारीही हजर