राज्यात शिवसेना-भाजप युती दीर्घकाळ टिकली. या दरम्यान, नाशिक महापालिका आणि जिल्हा परीषदेत उभय पक्षाची सत्ता आली असली तरी दोन्ही पक्षांत खदखद मात्र कायम होती. जिल्हा परिषदेच्या १९९७ च्या दरम्यान युतीने निवडणूक लढवण्यात आली. काठावर बहुमत असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक कठीण होती. मात्र त्यानंतरही भाजपाच्या एका महिला जिल्हा परिषद सदस्याने गद्दारी केली असा ठपका ठेवत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींनी त्यांना जिल्हा परिषदेच्या बाहेरच दणका दिला तसेच वसंत स्मृतीवर हल्ला बोल केला होता त्यावेळी भाजपाच्या वतीने तेव्हा नगरसेविका असलेल्या देवयांनी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष झाला होता.
त्यानंतर अलीकडील काळात भाजपाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर भाजप कार्यालयात कुत्रे नेऊन सोडण्यात आले होते तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून ताण वाढत असताना शिवसेनेच्या बाळा दराडे यांनी सेना कार्यालयासमोर फलक लावून भाजपाचा खिजवले होते.
अलीकडील काळात हा संघर्ष वाढला असला तरी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळीदेखील अनेकदा वाद आणि संघर्ष झाले आहेत. राज्यात भाजपाची सत्ता असतानाच महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकार यांच्या एका वादग्रस्त विधानावरून नाशिक पुणे रोडवर श्रीकृष्ण लॉन्स येथे सुरू असलेले महिला मेळावा उधळण्याचा प्रयत्न शिवसेना महिला आघाडीने (कै.) सत्यभामा गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली केला होता. नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या निवडणूकीत देखील शिवसेनेने बाबुराव आढाव उपसभापतीपदाच्या निवडणूकीत पराभूत झाल्याने देखील भाजपाच्या सदस्यावर गद्दारीचे आरोप करीत त्यांना बदडून काढले होते.
इन्फो...
नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष कायम असला तरी त्यात भाजप कार्यालयावर हल्लाबोल नवीन नाही. २०१२ मध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेशी युती तोडण्यामागे या वादाची देखील किनार होती.
इन्फो...
शिवसेनेच्या वतीने भाजपा कार्यकर्ते किंवा पक्ष कार्यालयावर हल्ले यापूर्वी देखील झाले आहेत. मात्र, पूर्वी सबुरीने घेणारे भाजपचे पदाधिकारी आता प्रत्युत्तर देऊ लागले आहेत हे विशेष होय.