येवला :अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अत्यल्प असून शेतक-यांना आणखी मदत वाढवून मिळावी, अशी मागणी येथील शिवसेनेच्या पदाधिका-यांसह शेतक-यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन येवला तहसीलदारांना देण्यात आले.यंदा अतिवृष्टीमुळे जगाचा पोशिंदा मानल्या जाणा-या शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्जमाफी पुरेशी दिली जात नाही. निसर्ग शेतक-याला साथ देत नाही. अशी स्थिती झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडाला असून येवला तालुक्यातील शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे, शेतातील सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. सरकारकडून दिली जाणारी मदत हि अत्यल्प असल्याने या मदतीत वाढ करून मिळावी तसेच शेतक-यांचा सातबारा कोरा करून कर्जमाफी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना नेते संभाजी पवार, उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे, तालुका प्रमुख रतन बोरनारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, झुंजार देशमुख, छगन आहेर, दिलीप बोरनारे, भागीनाथ थोरात, सुखदेव घोरपडे, बबनराव भातकुटे, विजय आहेर, धीरज परदेशी, बाजीराव देवडे, शैलेश पगारे आदीसह शेतकरी बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत.
शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 6:26 PM
येवला : तहसिलदारांना दिले निवेदन
ठळक मुद्देशेतक-यांचा सातबारा कोरा करून कर्जमाफी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.