नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आघाडीविषयी महाविकास आघाडीतील पक्षनेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकमध्ये आघाडी झाली अथवा नाही तरी महापौर शिवसेनाचा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच नाशिकमधील महापालिका निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी सहा सदस्यीय कोअर कमिटी तयार करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.
नाशिक महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नाशिकमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतानाच पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी नाशिकमधील निवडणूक रणनितीविषयी निर्णय घेण्यासाठी कोअर कमिटी तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. नाशिक मनपाच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करतानाच त्याविषयी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा करीत मुख्यमंत्र्यांपर्यंत ही माहिती पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावमध्ये भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची परतफेड केल्याचे सांगतानाच जळगावप्रमाणे नाशिकमध्येही शिवसेनेचा महापौर बनविता आला असता परंतु आम्ही ते केले नाही. आता थेट निवडणुकांनंतर पहिल्या वर्षापासूनच शिवसेनेचा महापौर असेल असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, नाशिकसह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केेले. यावेळी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख सुधाकर बडगुडर, माजी. आमदार वसंत गिते, शोभा मगर,सत्यभामा गाडेकर, माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदी उपस्थित होत.