नाशिक : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची युती होईल की नाही याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण असताना आज नाशकात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचे शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सिडकोत स्वागत केले, त्यामुळे युती होणार की बडगुजर भाजपात जाणार अशा चर्चांना संधी मिळून गेली आहे.महाजनादेश यात्रा नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरून सिडको मार्गे पंचवटी कारंजा कडे मार्गस्थ होत आहे. सिडकोचा परिसर हा परंपरेने शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणवतो. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून सदर यात्रा जात असताना व यात्रेतील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रथावर विद्यमान आमदार भाजपाच्या श्रीमती सीमा हिरे उपस्थित असताना त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणारे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक व गेल्या निवडणुकीत हिरे यांच्याच विरुद्ध शिवसेनेतर्फे निवडणूक लढलेले बडगुजर यांनी सावता नगर येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले, त्यामुळे हिरे यांच्या पोटात धस्स होणे स्वाभाविक ठरले.सिडको म्हणजे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपातील वाढत्या स्पर्धेमुळे भाजपा ऐवजी शिवसेनेला देण्याच्या चर्चा होत आहेत, त्यामुळे बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या स्वागताकडे वेगळ्या चष्म्यातून पाहिले जाणे स्वभाविक ठरले आहे. अर्थात युती टिकून राहणार असेल तर बडगुजर यांनी केलेल्या या स्वागता कडे गैर म्हणून पाहिले जाणार नाही परंतु जर युती तुटली तर बडगुजर यांना या सत्काराचा वेगळा फटकाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पश्चिम मतदार संघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी करणारे अन्यही दावेदार असून ते बडगुजर यांनी केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या स्वागताचे मातोश्रीवर भांडवल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्यावेळी विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुक प्रसंगी नाशकात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांने उद्धव ठाकरे यंच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने शिवसेनेतर्फे त्यांचा पत्ता कापला गेल्याचा इतिहास नाशिककर विसरलेले नाहीत. त्यादृष्टीने बडगुजर यांनी आज केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागताकडे पाहिले जात आहे.